शनिवार व रविवार झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. उभ्या पिकांमधून पाणी वाहिले नद्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे रस्ते पाण्याखाली गेले व वाहतूक ठप्प झाली. तर काही घरांमध्ये व वस्त्यांमध्ये पाणी घुसल्याने अनेक गावात जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील नद्यांना आलेल्या पुरात शेतातील पिके व जनावरे वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी पिकांना गरज असताना काही वेळेस कमी तर काही वेळेस प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्याने तालुक्यातील पिकासाठी आवश्यक पाण्याचे नियोजन कोलमडले आहे.
मशागत, बियाणे, खते यावर केलेला भरमसाठ खर्च कसा भरून काढायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. भावी निमगाव, शहर टाकळी, ढोसरडे, देवटाकळी, माठाचीवाडी, रांजणी व परिसरात अतिवृष्टी झाल्याने होत्याचे नव्हते झाले. शेतात डोलणारी पिके जमीन दोस्त झाली. तसेच भातकुडगाव, अमरापूर, आव्हाने, वडुले, वाघोली, फलकेवाडी तसेच तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव, बालमटाकळी, सुकळी, लाड जळगाव ,चापडगाव, मुरमी, बाडगव्हाण, गायकवाड जळगाव, गोळेगाव, नागलवाडी, दिवटे, आधोडी, राणेगाव, अंतरवाली परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
एकाच पावसाने खरीप पिकाच्या डोक्यावरून पाणी गेले असून तुर, कपाशी, उडीद, मूग, मका, कांदा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा पाऊस असाच चालू राहिला तर कपाशीचे बोंडे सडण्याचे संकट उभे राहणार आहे. कपाशीचे आगार म्हणून ओळखला जाणारा तालुका अतिदृष्टीने संकटात आला आहे. तालुक्यात वडोली येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकाला पोलीस कर्मचारी श्याम गुंजाळ यांनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन सुरक्षित ठिकाणी आणले. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व पोलीस उपनिरीक्षक रामहरी खेरकड उपस्थित होते.
तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना मोठे पूर आले. या पुराच्या पाण्यामुळे नदीपात्रालगतच्या शेतातील पिकात पाणी घुसल्याने अतोनात नुकसान झाले आहे. नद्यांना आलेल्या पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अनेक वाहनधारक अडकून पडले होते.

