शेवगाव शहरातील पंचायत समिती रोडवरील शिववंदना इमारतीत शनिवारी सकाळी साडेआठ वाजे दरम्यान गॅस टाकीचा मोठा स्पोट होऊन दोन जण जखमी झाले. इमारतीच्या खिडक्याच्या काचा फुटल्या व भिंतींना तडे गेले तर एका दुकानाचे शटर वीस फुटावर जाऊन पडले.
पंचायत समिती रोडवरील इमारतीत काही दुकाने आहेत. पहिल्या मजल्यावर इमारतीचे मालक शिवाजी शेळके राहतात. शनिवारी सकाळी गॅस टाकी स्फोटाच्या आवाजाने शेळके यांच्या कुटुंबातील सदस्य खाली पळत आले. समोरील दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. स्पोटाचा आवाज घुमल्याने परिसरातील नागरिक घराबाहेर धावले. स्थानिकांनी तातडीने बचाव कार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात हलविले. शिवाजी शेळके यांचा मुलगा समर्थ शेळके व आणखी एक युवक जखमी झाले. त्यांच्यावर शेवगाव येथील प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. स्पोटाच्या हादऱ्याने समर्थ इलेक्ट्रिक मधील विक्रीसाठी ठेवलेल्या गॅस शेगडी, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक व अन्य साहित्याचे नुकसान झाले. दुकानात शेजारील मोरया मेडिकलचे लोखंडी शटर वीस फूट लांब जाऊन पडले. व समोरील काचाचा चुरा झाला.
घटनास्थळी शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथकासह धाव घेतली. शहरातील गॅस गोदामे व रिपेरिंग दुकाने वस्तीपासून दूर हलविण्याची गरज आहे. तातडीने नियमावली करून योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी माहिती मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी दिली.

