शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे अवैधरित्या देशी विदेशी दारूचा साठा करून विक्री करणाऱ्या आरोपीकडून 39 हजार 220 रुपये किमतीची दारू शेवगाव पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई मुंगी (ता.शेवगाव) येथे करून देवेंद्र सोनटक्के (वय 27) यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी हवालदार एकनाथ अंबादास गर्कळ यांच्या फिर्यादी वरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे आरोपी विरोधात गुन्हा करण्यात आला आहे.
मुंगी येथे बंद घराच्या आडोशाला अवैधरित्या देशी-विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळाली मुटकुळे यांनी खात्री करण्यासाठी पथक तयार करून मुंगी येथे पाठविले. तेथे देवेंद्र सोनटक्के देशी-विदेशी दारूचा अवैधरित्या साठा करून घराच्या आडोशाला दारूची विक्री करत असताना आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव व दारू विक्रीचा परवाना असल्याबाबत खात्री केली. मात्र, त्याच्याकडे दारू विक्रीचा परवाना नसल्याचे आढळून आले. त्याच्याकडून देशी-विदेशी दारूच्या 256 बाटल्या सह 39 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे ,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, बाजीराव सानप, चंद्रकांत कुसारे, ईश्वर गर्जे, श्याम गुंजाळ, एकनाथ गर्कळ,प्रशांत आंधळे यांच्या पथकाने केली.
