शेवगाव तालुक्यातील आखेगाव सह पूर्व भागात सोमवारी दुपारनंतर आलेल्या वादळी वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने शेतकऱ्याचे नुकसान केले आहे. दुपारी तीनच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले कांदा चाळीत टाकण्यासाठी चालू असलेली कामे पूर्णत ठप्प झाली. काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली घरावरील पत्रे व छपरे उडून गेले कांद्याचे, उन्हाळी बाजरीचे, आंबा, पपई आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गचक्राने हिरावून घेतला आहे. काही आठवड्यापूर्वी शेवगाव तालुक्याच्या पश्चिम भागात वादळाने शेडनेट उडून गेल्याने शेतकऱ्याची मोठी हानी झाली होती. आता पुन्हा पूर्व भागाला निसर्गाच्या कोपाचा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पावसामुळे आर्थिक नुकसान झाले असले तरी काही प्रमाणात जमीन मशागतीसाठी व उसासारख्या पिकासाठी हा अवकाळी पाऊस संजीवनी ठरू शकतो. या भागात पिण्याच्या पाण्याची तीव्रता जाणवत होती. भूगर्भातील पातळी खालवल्यामुळे टँकरला मागणी वाढली होती व पावसामुळे साठलेल्या पाण्यामुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे.
