Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

शेती मशागतीच्या कामाला आला वेग; बोधेगाव परिसरात खरीप पेरणीपूर्व तयारी


बोधेगाव परिसरासह शेवगाव तालुक्यातील शेतकरी आता खरीप पेरणीच्या तयारीला लागले असून शिवारात मशागत करण्याची धांदल सुरू झाली आहे. रब्बी हंगामातील पिके घेऊन आता शेतकऱ्यांनी खरीप पेरणीकडे लक्ष वळविले आहे. शेतामधील गवत, कडबा यासह इतर पिके काढून कोळपणीला सुरुवात केली आहे. एकीकडे लग्नसराई आणि दुसरीकडे शेतकामांची घाई असे चित्र बोधेगाव शिवारात दिसत असले तरी परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतातील उभ्या उन्हाळी धान पिकाला नुकसान होत असल्याचे चित्र आहे.


 मे च्या अखेरच्या पासून खरिपाच्या पेरणीला सुरुवात होते. शेवगाव तालुक्यातील शेतकरी जास्तीत जास्त कापूस, तुर, सोयाबीन पीक घेत असतात. या पिकासाठी शेतीमध्ये मातीची मशागत केली जाते. शेवगाव तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणि बैल जोडीने पेरणीसाठी मशागत सुरू केली आहे. शेणखत टाकून ते पसरविण्याचे कामही सुरू झाले आहे. तालुक्यात अवकाळी पाऊस दमदार प्रमाणात कोसळला आहे. त्यामुळे शिवारात शेतामध्ये तनाची उगवण बऱ्यापैकी झाली आहे. हा पाऊस पोषक ठरला आहे. शेतातील बांधाच्या धुर्‍यावर असलेले तुरीचे धसकटे काढण्यात व शेणखत टाकण्यात शेतकरी व्यस्त दिसत आहेत.


मुबलक पाणी असणारे सदन शेतकरी मे च्या शेवटच्या आठवड्यात पेरणीला सुरुवात करण्याची शक्यता आहे. मृग नक्षत्राच्या तोंडावरही पेरणी करण्यासाठी काही भागातील शेतकरी नियोजन करतात पावसाने साथ दिल्यास जून मध्यापर्यंत पेरणी पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा जाणवत असल्याने शिवारातील काम करणे सोपे जात असले तरी उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. तरीही बळीराजा मशागतीची कामे करण्यात व्यस्त दिसत आहे.


चौकट

___________________________

सध्या पारंपरिक शेती करणे अवघड झाले आहे. मुजरांचा तुटवडा तसेच काम करताना अधिक विलंब लागत असल्यामुळे शेतकऱ्यांनी यंत्राच्या साह्याने शेती करण्यावर भर दिला आहे. बैल जोड्यांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टर तसेच इतर यंत्राच्या साह्याने शेतातील कामे केले जात आहेत. 

नकुल जावळे- शेतकरी (दिवटे)

----------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.