अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शेवगाव तालुक्यातील फलकेवाडी गावात मुळा पाटबंधारे पाटाचे पाणी पोहोचले असून शेतकऱ्यांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा ऐतिहासिक क्षण आमदार मोनिकाताई राजळे यांच्या सहकार्याने व प्रशासन आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नाने आला आहे. गेले अनेक वर्षापासून फलकेवाडी गावात पाटाचे पाणी येत नव्हते. त्यामुळे गावातील शेती पावसावर अवलंबून होती. यामुळे खरीप हंगामात पिकाची हमी नव्हती आणि रब्बी हंगाम संपूर्णपणे कोरडा जात होता.
शेतकर्यांची होणारी आर्थिक कोंडी, स्थलांतर आणि बेरोजगारी यामुळे गावाच्या विकासात मोठा अडथळा निर्माण झाला होता. आमदार मोनिकाताई राजळे यांच्या विशेष सहकार्याने आणि पाठपुराव्याने मुळा पाटबंधारे विभागाच्या चारीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या कामाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डॉक्टर विजय फलके यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांनी प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवत गावासाठी आवश्यक ते सर्व पाठबळ मिळवले. या कामात मुळा पाटबंधारे विभागाच्या सायली पाटील, स्वप्निल देशमुख व त्यांच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी अत्यंत निष्ठेने आणि तत्परतेने काम केले. पाणी वितरणाचे नियोजन चारीची साफसफाई गळती रोखण्यासाठी केलेली उपाययोजना आणि वेळेत सर्व यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे श्रेय या सर्वांना जाते.
आज पाटाचे पाणी गावाच्या सीमेत पोहोचल्यावर गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच ग्रामस्थांनी आमदार मोनिकाताई राजळे, डॉक्टर विजय फलके अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. हा एक नवा अध्याय फलकेवाडी च्या विकासाच्या दिशेने एक पाऊल ठरणार आहे. शेतीसाठी स्थिर पाणीपुरवठा उपलब्ध झाल्यामुळे आता गावात उत्पादन वाढीबरोबरच आर्थिक सुबत्ता येण्याची आशा व्यक्त होत आहे. फलके वाडीकरांचा हा लढा आणि यश नक्कीच इतर गावासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
