दिवटे (ता. शेवगाव) सह लाडजळगाव, गोळेगाव, आधोडी, राणेगाव परिसरात पाऊस व वादळी वाऱ्याने थैमान घातले असून दररोजच्या ढगाळ वातावरणाने चादर पांघरली. शुक्रवार (ता.१६) दुपारी चार वाजेच्या सुमारास दिवटे (ता. शेवगाव) सह परिसरात जोरदार वादळी वाऱ्याने ३०मिनिटे जोरदार हजेरी लावली.
पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली तर काही ग्रामस्थांचे घरावरील पत्रे उडाल्यामुळे प्रचंड नुकसान झाले. एवढेच नव्हे तर सोंगलेल्या रब्बीसह उन्हाळी बाजरी ज्वारी, वादळी वाऱ्याने रानात अस्ताव्यस्त विखुरले गेले.
शुक्रवार (ता.१६) अचानक वातावरणात बदल होऊन दिवटे सह लाडजळगाव, गोळेगाव, आधोडी, राणेगाव, शोभानगर आदी ठिकाणी वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावल्याने सोंगणी केलेले ज्वारीचे पाचुंदे, बाजरीच्या सुड्या रानोमाळ विखुरल्या गेल्या तर आंब्याला लगडलेल्या कैऱयाचा झाडाखाली सडा पडल्यामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले. काही ठिकाणी कच्चे पत्र्याचे घर उडून गेले. एकंदर वादळी वाऱ्यामुळे काही कळण्यापूर्वीच सर्व दाणादाण उडाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

