नुकसान भरपाई साठी शासनाकडे पाठपुरावा करणार
अतिवृष्टीमुळे पाथर्डी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी आ. मोनिका राजळे यांनी गुरुवारी केली. या पाहणी दरम्यान धनंजय बडे, दिगंबर भवर, विष्णुपंत अकोलकर, बजरंग घोडके, संदीप पठाडे, नारायण पालवे, काकासाहेब शिंदे, रवींद्र वायकर, भगवान मरकड, राधाकिसन मरकड, शुभम गाडे, बाळासाहेब शिरसाठ, शिवनाथ मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार राजळे यांनी गावातील प्राथमिक नुकसानीची माहिती घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त एकही शेतकरी अथवा नागरिक शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये अहवाल लवकरात लवकर तयार करून शासनाकडे सादर करावा अन्यथा जबाबदारी अधिकाऱ्यांवरील येईल असे कठोर शब्दात त्यांनी प्रशासनाला बजावले.
या अतिवृष्टीमुळे शेतीतील पिकासह शेतीची माती वाहून गेली असून खरड जमिनीचेही स्वतंत्र पंचनामे करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. विहिरी, रस्ते, पूल, विद्युत खांब, बंधारे वाहून गेले आहेत. घराची पडझड होऊन धान्यासाठा नष्ट झाला आहे. ही हानी कधीही भरून निघणारी नाही. असे आमदार राजळे म्हणाल्या.
शासनाने सरसकट पंचनाम्याचे आदेश दिले असून त्यानुसार कामकाज तातडीने पूर्ण करावे असेही त्यांनी प्रशासनाला बजावले.

