Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

शेअर बाजाराच्या नावाखाली लाखोंना गंडा ; 'क्लासिक ब्रीज मनी सोल्यूशन’कडून गुंतवणूकदारांची ‘लाखोंची फसवणूक


नगर क्लासिक ब्रीज मनी सोल्युशन प्रा.लि. या संस्थेच्या नावाखाली गुंतवणूकदारांना १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर एक रुपयाही न देता गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी या संस्थेचा चेअरमन संदीप सुधाकर थोरातसह ६ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चेअरमन संदीप थोरातसह दिलीप कोरडे या दोघांना नगरमध्ये पकडले आहे.


याबाबत गोरख सीताराम वाघमारे (वय ६३, रा. तहसील कार्यालयाजवळ पाथर्डी रोड, शेवगाव) यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात ४ मार्च रोजी रात्री उशिरा फिर्याद दिली आहे. क्लासिक ब्रीज मनी सोल्युशन प्रा.लि. या संस्थेचा चेअरमन संदीप सुधाकर थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल सिताराम खरात, दिपक रावसाहेब कराळे, दिलीप तात्याभाऊ कोरडे, नवनाथ सुभाष लांडगे, सचिन सुधाकर शेलार (सर्व रा.  अहिल्यानगर) यांनी संगनमताने आखेगाव रोड, वरूर चौफुली, शेवगाव येथे संस्थेचे कार्यालय सुरु केले


गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी या आरोपींनी विविध क्लुप्त्या लढविल्या. गुंतवणूकदारांना ठेवींवर १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले. या आमिषापोटी फिर्यादी गोरख वाघमारे यांनी २३ लाख १०० रुपयांची गुंतवणूक या संस्थेत केली. त्यांच्या प्रमाणेच इतर अनेक गुंतवणूकदारांनी लाखो रुपये या संस्थेत गुंतविले. मात्र त्यांना परतावा देण्यास टाळाटाळ सुरु करण्यात आली. वाघमारे यांनी याबाबत अनेकदा पाठपुरावा करून पैशांची मागणी केली. मात्र त्यांना प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगण्यात आली.


गुंतविलेल्या २३ लाखांपैकी १ रुपयाही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिस अधिक्षक कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीची चौकशी होवून अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गोरख वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संदीप सुधाकर थोरातसह ६ जणांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३१६ (२), ३१६ (५), ३ (५), महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण (एमपीआयडी) कायदा कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर ५ मार्च रोजी दुपारी चेअरमन संदीप थोरातसह दिलीप कोरडे यास नगरच्या पाईपलाईन रोड येथून शेवगाव पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले असल्याची माहिती पो.नि. समाधान नागरे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.