भागातील गोरगरीब नागरिक महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. गॅस सिलेंडरचे वाढलेले दर सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांना परवडत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना घरातील सिलेंडर जास्त दिवस चालावा म्हणून शेतावर, माळरानावर फिरून जाळण्यासाठी सरपण गोळा करण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे.
घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 811 रुपये वर पोहोचली असून त्यामध्ये अतिरिक्त गाडी भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे सिलेंडरचा खर्च एक हजारावर पोहोचला आहे. अशा स्थितीत गॅस सिलेंडर घेणे परवडत नसल्याने ग्रामीण भागातील महिलांना पुन्हा चुलीचा आधार घ्यावा लागत आहे. सरपण गोळा करण्यासाठी गावातील महिला वन वन शेतामध्ये भटकंती करताना तालुक्यातील गावागावात दिसत आहेत. उज्वला योजनेतून गरीब कुटुंबांना गॅस सिलेंडर आणि शेगडी सरकारकडून मिळाली. परंतु, ग्रामीण भागातील गरीब कुटुंबास सिलेंडर भरण्यासाठी पैसे नसल्याने गॅस टाकी भरून घेता येत नाही. त्यामध्ये अनुदान बंद झाले आहे. यामुळे उज्वला योजनेचा मूळ उद्देश बाजूला पडला आहे. गॅस टाकी भरता येत नाही. आणि रेशन वरील रॉकेल देखील मिळत नाही. त्यामुळे महिलांना वाळलेले लाकूड, सेनाच्या गोवरयासाठी शेतावर फिरावे लागत आहे. स्वस्त धान्य दुकानातून धान्यासह रॉकेल मिळत होते. परंतु, गॅस चा लाभ घेतल्यामुळे दुकानातून मिळणारे रॉकेल बंद झाले. त्यामुळे महिला सरपण व गोवऱ्या गोळा करण्याकडे पुन्हा वळू लागल्या आहेत. सिलेंडरच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याने 'आपली चूल बरी' अशी भावना ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील महिलांची झाली आहे.
