आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा; मागण्यांबाबत ग्रामस्थ आक्रमक
शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील पाझर तलावाची दुरुस्ती करून पाण्याची साठवण क्षमता वाढवून सिमेंटची भिंत बांधावी, तसेच रोहयोंतर्गत अनुदानित विहिरी मिळणे कामी गावाचा समावेश सुरक्षित वर्गवारीत व्हावा या दोन प्रमुख मागण्यांसाठी येथील ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. 11) बोधेगाव येथे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले.
दरम्यान, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे जलसंधारण अधिकार्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. परंतु जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
गोळेगाव येथील ग्रामस्थांचे मागण्यांसंदर्भात गेल्या 17 दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून, कोणीही अधिकारी आंदोलनाकडे फिरकले नसल्याने, तसेच तलावाच्या दुरुस्तीसंबंधित लेखी आश्वासन न दिल्याने ग्रामस्थांनी बेमुदत धरणे आंदोलनाचे रूपांतर मंगळवारी (दि. 11) रास्ता रोको आंदोलनात केले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या नाहीतर आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी आक्रमक भूमिका घेतली होती.
आंदोलनामुळे शेवगाव-गेवराई महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्याने प्रवाशांनाही मोठा मनःस्ताप सहन करावा लागला.दरम्यान, जलसंधारण अधिकार्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. परंतु बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या वेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी शिवंमदापकर, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी आकाश परदेशी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रवीण दहातोंडे, उपअभियंता आनंद रूपनर, गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सचिन भाकरे, दादासाहेब शेळके, स्थापत्य अभियांत्रिकी जब्बारभाई पटेल, ग्रामविकास अधिकारी उद्धव जाधवर आदी आंदोलनस्थळी उपस्थित होते.
आंदोलनात सरपंच मुक्ताबाई आंधळे, संजय आंधळे, वंचितच्या महिला तालुकाध्यक्ष संगीता ढवळे, प्रकाशबापू भोसले, बद्री बर्गे, शरद फुंदे, अमोल वावरे, बाबा डोंगरे, संदीप फुंदे, अर्जुन फुंदे, केशव बर्डे, नवनाथ रासनकर, जालिंदर बर्डे, सुनील फुंदे, विजय साळवे, भारत आंधळे, गणेश सानप, लक्ष्मण सानप, सुरेश फुंदे, अशोक बर्डे, भागवत डमाळे, जगन्नाथ रासनकर, बापू फुंदे, वसंत बर्डे, शरद बर्डे ,संतोष आंधळे, बबन बर्डे, हरी आंधळे, येल्हाबई जोहरे, मीरा फुंदे, शोभा फुंदे, मनीषा डमाळे, पंचफुला बर्डे, मीना बर्डे, राधा रासकर आदी सहभागी झाले होते. शेवगावाचे पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
