पूर्वी जेवणात स्वाद आणि संस्कृती दोन्ही जपणाऱ्या पळसाच्या व केळीच्या पानाच्या पत्रावळ्यांना आता प्लास्टिकच्या सर्रास वापराने कालबाह्य केले आहे. पूर्वी लग्न, समारंभ, सार्वजनिक घरगुती कार्यक्रमात आवर्जून पानापासून बनवलेल्या पर्यावरण पूरक पत्रावळीचा वापर केला जायचा. लग्नसराई दिवसात पळस आणि मोहाच्या पानापासून तयार केलेल्या पत्रावळीतून ग्रामीण नागरिकांना रोजगार मिळत होता. पण प्लास्टिक पत्रावळींनी हा रोजगार दुरावला आहे.
ग्रामीण भागातही आता मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पत्रावळ्यांचा वापर सुरू आहे. हा बदल सुलभतेच्या नावाखाली होत असला तरी त्याचे पर्यावरण जनावरांच्या आरोग्यावर आणि ग्रामीण संस्कृतीवर गंभीर परिणाम होत आहेत. स्वस्त पण घातक पर्याय किमतीने कमी आणि वापरायला सोपी अशी प्लास्टिकची पत्रावळी पहिल्यांदा बाजारात आली तेव्हा ती एक सोयीस्कर पर्याय वाटत होती. मात्र 'युज अँड थ्रो' संस्कृतीच्या आहारी जाऊन आज तिचा अतिवापर होत आहे.
याचे दुष्परिणाम आता डोळ्यासमोर दिसत आहेत. प्लास्टिकचे रिसायकलिंग करणे अत्यंत कठीण असून त्याचे विघटन वर्षानुवर्ष होत नाही. त्यामुळेही पत्रावळी कार्यक्रमानंतर उघड्यावर फेकली जातात आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा करतात. सरकार एकीकडे प्लास्टिक मुक्त भारत, हरित भारत अशा मोहिमा राबवत आहे. आणि लग्न, कार्यक्रम, कीर्तन, भंडारा अशा सार्वजनिक प्रसंगात प्लास्टिकच्या पत्रावळ्याचा उघडपणे वापर सुरूच आहे. त्यावर कुठलाही अंमलबजावणीचा वचक दिसत नाही. शाळा, मैदाने, मोकळी जागा या ठिकाणी प्लास्टिकच्या कचऱ्याचे ढीग लागले आहेत. पण प्रशासनाचे लक्ष नाही. सध्या निर्माण झालेली स्थिती पाहता पळस, मोह, केळीच्या पानापासून बनवलेल्या पारंपारिक पत्रावळ्यांचा वापर पुन्हा सुरू करण्याची नितांत आवश्यकता आहे. काही स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरण प्रेमी यांनी अशा पर्यायी पत्रावळ्यांचे प्रशिक्षण व प्रचार प्रसार सुरू केला आहे. शासनाने ही अशा अनेक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन प्लास्टिकच्या पत्रावळ्यावर निर्बंध आणण्याची गरज आहे.
