शेवगाव शहरात पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर सर्वपक्षीय कृती समितीने क्रांती चौकात रास्ता रोको आंदोलन केले. नगरपरिषद प्रशासनाने आंदोलन स्थगित करत पाणीपुरवठा योजना लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे नागरिकांचा संयम सुटला आहे. शहराला सध्या १२ ते १५ दिवसांतून एकदा आणि तेसुद्धा अत्यल्प प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे रखडलेले काम आणि नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी (दि. ५) क्रांती चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पाणीपुरवठ्यासह शहरातील अन्य समस्यांवर नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला.
आंदोलनस्थळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी भेट देऊन स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची सविस्तर माहिती दिली. नागरिकांच्या सूचना आणि हरकती विचारात घेऊन ही योजना लवकर पूर्ण करून शेवगावकरांना मुबलक पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. या आंदोलनात ज्येष्ठ नेते अरुण पाटील लांडे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, भाकपचे सेक्रेटरी अॅड. सुभाष लांडे, भाजपचे राज्य सचिव अरुण मुंढे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष हरीश भारदे, माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, कॉ. संजय नांगरे, स्वाभिमानीचे दत्ता फुंदे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश चिटणीस नंदकुमार मुंढे, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, कमलेश गांधी, धनंजय डहाळे, अमोल सागडे, विजय देशमुख, राहुल सावंत, अंकुश कुसळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले.
नागरिकांच्या मागण्यांमध्ये स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेच्या संथ कामाचा मुद्दा प्रामुख्याने होता. या योजनेच्या साठवण टाक्या, पाणी साठवण क्षमता, शहरालगतच्या वाड्या-वस्त्यांना नळजोडणी आणि पाइपलाइन याबाबत नगरपरिषदेने नागरिकांना विश्वासात घेतलेले नाही, असा आरोप आहे. पुढील तीस वर्षांचा विचार करून ही योजना राबवली जात असली, तरी योजनेनंतर दररोज पुरेसे पाणी मिळेल याबाबत नागरिकांच्या मनात शंका आहे. याशिवाय, शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यात आले, पण त्यामुळे दगड-माती साईड गटारीत साचली, ज्यामुळे गटारी बुजल्या आणि धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
आंदोलकांनी नगरपरिषदेने योजनेच्या ठेकेदार आणि तांत्रिक सल्लागारांसह सविस्तर बैठक घेऊन नागरिकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी केली. तसेच, शहरातील गटारी आणि रस्त्यांची समस्या तातडीने सोडवावी, असेही सांगितले. मागण्या मान्य न झाल्यास नगरपरिषद कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
