शेवगाव व पाथर्डी तालुक्यात कमी पावसामुळे आगामी काळात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. टंचाई निवारणार्थ तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आमदार मोनिकाताई राजळे यांनी प्रशासनाला केल्या आहेत. शेवगाव तालुक्याची आढावा बैठक नुकतीच झाली. आमदार मोनिकाताई राजळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत तालुक्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला.
शनिवार दि. 22 रोजी रोजी शेवगाव तालुका टंचाई आढावा बैठक तहसिल कार्यालयात आ. मोनिकाताई राजळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपस्थित विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी व उपस्थित नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तातडीने सोडवण्याबाबत संबंधित विभागास निर्देश आ. मोनिका राजळे यांनी दिले.
पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी व वीज याचे सुयोग्य नियोजन करून मतदारसंघातील सर्व गावे, वाड्या-वस्त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होऊ नये या बाबत ग्रामसेवक, तलाठी, व संबंधित गावचे नागरिक यांनी योग्य तो समन्वय साधावा. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही.
तसेच विविध शासकीय योजनांचे लाभार्थी जसे की महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी बांधव यांना E-KYC व तत्सम कामकाज संदर्भात नेहमीच तालुक्यास यावे लागते असे निदर्शनास आले असून या बाबत गाव पातळीवरीच वरील काम करून घेण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकारी वर्गास दिल्या.
या टंचाई आढावा बैठकीस ताजनापूर उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, तहसीलदार प्रशांत सांगडे, गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर, मुख्याधिकारी विजया घाडगे , पोलिस निरीक्षक समाधान नामरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रल्हाद पाठक, गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, बापूसाहेब भोसले, उमेश भालसिंग, कचरू चोथे, भीमराज सागडे, अनिल सानप, डॉ. धीरज लांडे, कमलेश गांधी, गणेश रांधवणे तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी व विविध गावचे सरपंच, उपसरपंच, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
