Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

उन्हाच्या झळांमुळे शाळांची वेळ बदलली, आता सकाळच्या सत्रात भरतील शाळा


वाढत्या उन्हाच्या झळा लक्षात घेता  अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. जिल्हा परिषदेसह सर्व व्यवस्थापनांच्या शाळा आता सकाळच्या सत्रात भरतील, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. हा निर्णय २० मार्च २०२५ पासून लागू होत असून,


उन्हाळी सुटी लागेपर्यंत म्हणजेच १ मेपर्यंत शाळा सकाळी ७ ते दुपारी १२:३० या वेळेत चालतील. या संदर्भातील आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी बुधवारी जारी केले आहेत. विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा बदल करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.


जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे ३,५०० आणि इतर व्यवस्थापनाच्या १,५०० अशा एकूण ५,००० शाळा आहेत. या सर्व शाळांना नवीन वेळापत्रकाचे पालन करणे बंधनकारक असेल.


दरवर्षी मार्च महिन्यात तापमानात वाढ होते आणि त्यानुसार शाळांच्या वेळेत बदल केला जातो. सध्या शाळा सकाळी १०:३० ते सायंकाळी ५ या वेळेत भरतात, परंतु उन्हाळ्यात पाण्याची कमतरता आणि उष्णतेमुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.


उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर होतो, विशेषतः ग्रामीण भागात. याशिवाय, अनेक शाळा पत्र्याच्या इमारतीत असल्याने दुपारच्या वेळी उकाडा वाढतो, ज्याचा त्रास विद्यार्थी आणि शिक्षकांना सहन करावा लागतो.


या पार्श्वभूमीवर शिक्षकांकडूनही शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी होत होती. त्यानुसार, गुरुवारपासून (दि. २० मार्च) जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळी ७ ते दुपारी १२:३० या वेळेत सुरू राहतील. हा बदल सुमारे ४० दिवस, म्हणजेच उन्हाळी सुटीपर्यंत कायम राहील.


जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यासाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार केले आहे. सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर पहिली १० मिनिटे परिपाठासाठी ठेवली आहेत. त्यानंतर आठ तासिका पूर्ण केल्या जातील.


सकाळच्या सत्रात शाळा असल्याने मधली सुटी सकाळी ९:३५ ते १०:१० अशी ३५ मिनिटांची असेल. या बदलामुळे विद्यार्थ्यांना दुपारच्या कडक उन्हातून दिलासा मिळेल आणि शिक्षण प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.