Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

विधानसभेला झालं ते विसरा ! मतदारसंघातील विकास कामावर लक्ष केंद्रित करणार


राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी मतदारसंघातील विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याची घोषणा केली आहे. “विधानसभेला काय झाले ते विसरून जाऊया. सुमारे लाखभर लोकांनी आपल्याला मते दिली आहेत, आणि त्यांच्या विश्वासाला उतरून आमदार म्हणून काम करायचे आहे,” असे ते म्हणाले. १ एप्रिलपासून खासदार नीलेश लंके यांच्यासोबत मतदारसंघाचा दौरा करून स्थानिक समस्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


पाथर्डी शहरातील संस्कार भवन येथे झालेल्या आढावा बैठकीत प्रताप ढाकणे यांनी आगामी कार्यपद्धती आणि नियोजन यावर चर्चा केली. बैठकीस शिवशंकर राजळे, माधव काटे, बंडूशेठ रासने, वजीर पठाण, भारत लोहकरे, नसीर शेख, बन्सीभाऊ आठरे, डॉ. दीपक देशमुख, सीताराम बोरुडे, दिनकरराव पालवे, वसंत खेडकर, रामराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.


ढाकणे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही आणि तरुणांच्या हाताला काम नाही, अशी टीका सध्याच्या सरकारवर केली. त्यांनी सांगितले की, सत्ताधारी पक्ष जनतेच्या समस्यांवर लक्ष न देता हिंदुत्वाचा आधार घेऊन राजकीय मुद्दे पुढे आणत आहे. “देश संविधानावर चालतो, आणि आपण मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,” असे ते म्हणाले.


१ एप्रिलनंतर ढाकणे आणि लंके मतदारसंघातील समस्यांचे निरीक्षण करून थेट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत. “आम्ही जनतेच्या समस्या थेट सरकारपर्यंत पोहोचवू आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी आवश्यक ती भूमिका बजावू,” असे त्यांनी स्पष्ट केले.


ढाकणे यांनी प्रशासनावर अंकुश नसल्याचे सांगत मतदारसंघातील विकासकामांमध्ये भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप केला. “भुयारी गटार योजना हा टक्केवारीच्या उद्योगाचा एक भाग आहे,” असे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर, आठवड्यातून एक दिवस ते तहसील आणि पंचायत समिती कार्यालयात थांबून लोकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.


मढी गावातील ठरावाचा उल्लेख करताना ते म्हणाले, “मलाही हिंदुत्वाचा अभिमान आहे, पण समाजात तणाव निर्माण होऊ नये. शेजारच्या जिल्ह्यातील परिस्थिती आपल्याकडे तयार होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.”


नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सज्ज

येत्या काळात मतदारसंघात स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी ढाकणे आणि लंके एकत्र काम करणार आहेत. शासनाकडून होणाऱ्या विलंबाला वाचा फोडण्यासाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते पुढाकार घेत असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.