आनंदाचा शिधा अंतर्गत रेशन कार्ड धारकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चणाडाळ आणि एक लिटर पामतेल मिळायचे दसरा, दिवाळी सह अन्य मोठ्या सणांना आनंदाचा शिधा दिला जायचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील एक कोटी 63 लाख लोकांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र आता ही योजना बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येते आहे.
राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार वाढल्याने ही योजना बंद करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्याच बरोबर महायुती सरकारने 2022 मध्ये ही योजना सुरू केल्यामुळे आता गुढीपाडवा, गणपती आणि दिवाळी सारख्या सणांना सरकारकडून मिळणारे खाद्यपदार्थ मिळणार नाहीत.
या वस्तू आता बाजार भावाप्रमाणे एक कोटी 63 लाख लोकांना खरेदी कराव्या लागणार आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात या योजनेवर सुमारे 602 कोटी रुपये खर्च करण्यात येत होते. या योजने पाठोपाठ तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली दहा रुपयांमध्ये शिवभोजन थाळी ही योजना देखील बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कारण या योजनेसाठी ही निधीची तरतूद आखण्यात आलेली नाही.
निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आल्याने सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भारत पडला आहे. लाडकी बहीण योजनेचा फटका या अन्य योजनांना बसताना दिसून येत आहे. निवडणुकीआधी भरमसाठ योजनांची घोषणा करून आता त्या योजना फडणवीस सरकार बंद करत असल्याचे यातून दिसते आहे. एकीकडे ही योजना बंद झाल्याचे सांगण्यात येत असताना दुसरीकडे मात्र सरकारकडून या योजनेबाबत अधिकृत माहिती दिली जात नाही.
