मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या व मागील तीन चार वर्षापासून वेगवेगळ्या कारणामुळे प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अजून उशीर होणार असून त्यामुळे दुसऱ्या फळीतील इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते नाराज झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात होणारी सुनावणी सहा मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यावेळी न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला तरी संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्षात आणायला किमान तीन महिन्याचा अवधी लागणार आहे.
त्यामुळे या निवडणुका पावसाळ्यानंतर दसरा, दिवाळी दरम्यान होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणात महापालिका सह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांच्या संख्येची निश्चिती प्रभाग रचना सदस्य संख्या निवडणूक आयोगाने करायची की राज्य सरकारने, ओबीसी आरक्षण आदी मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. सहा मे च्या सुनावणीत निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यास पावसाचा उमेदवार, मतदार, कार्यकर्ते, निवडणूक प्रक्रियेतील सरकारी अधिकारी, कर्मचारी या सर्वांनाच त्रास होऊ शकतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून सुरू होतो. पावसाळ्यात पाडणाऱ्या जोरदार पावसामुळे निवडणूक घेणे शक्य नाही. गौरी गणपती आटोपल्यानंतर पितृ पंधरवडा येतो. त्यानंतर या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इच्छुकाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकवाचे कार्यक्रम, देवदर्शन यात्रा चे नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वी देखील अनेकदा निवडणुका लागणार आहेत. या माहितीनुसार इच्छुकांनी तयारी सुरू केली होती. मात्र, निवडणूक वारंवार काही कारणास्तव लांबणीवर गेल्याने अनेकांचा हिरमोड झाला. त्यात आता पुन्हा एकदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची चर्चा रंगू लागल्याने इच्छुकांनी तयारी करायला सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाबाबत निर्णय काहीही होओ पण आपली निवडणुकीची तयारी जोरात सुरू ठेवावी लागत असल्याने जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार वैतागले आहेत.
विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सह तमाम राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भाष्य असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. तसेच राजकीय पक्षांनीही मोर्चे बांधणी सुरू केली असून पक्षाचे मेळावे व बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ दिले जात आहे.
इथे आहेत प्रशासक
महानगरपालिका
जिल्हा परिषद
पंचायत समिती
नगरपंचायती
नवनिर्मित महापालिका
