सद्गुरु नारायण पुरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. संत नारायण पुरी महाराज मंदिर टेकडी परिसरातील गोदावरी नदीच्या काठावर सायंकाळी चार ते सात या वेळेत हा कुस्ती आखाडा रंगला होता. पैठण एसटी महामंडळाचे चालक आणि नारायण पुरी महाराज भक्त मनोज पाटील नरके यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्त्या स्पर्धा पार पडल्या.
या कुस्ती स्पर्धेत पैठण, टाकळी अंबड, हिरडपुरी, नवगाव, विहामांडवा, तांबे डोणगाव, बिडकीन, मुंगी, धोंडराई, उमापूर, बोधेगाव, शेवगाव, गेवराई, अंबड, घनसांगवी, पाथर्डी, कन्नड, जालना, तसेच राजस्थान मधील हनुमान नगर येथील मल्लांनी सहभाग घेतला होता. एकूण 150 पैलवानांनी कुस्ती लढती खेळल्या शंभर रुपये ते तीन हजार रुपये बक्षीस असलेल्या कुस्त्यांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. तीन हजार रुपयाची अंतिम कुस्ती पैलवान शिवाजी बाबर (रुई भराडी ता. अंबड) आणि पैलवान राम रकटे (मुंगी तालुका शेवगाव) यांच्यात झाली.
अटी तटीच्या लढतीत शिवाजी बाबरने राम रकटे याला चित करत विजेतेपद पटकावले. महिला कुस्तीत दोन हजार रुपयांच्या अंतिम लढतीत पैलवान रेवती पवार (चापनेर तालुका कन्नड) आणि पैलवान किरण राजपूत (हनुमान नगर, राजस्थान) यांच्यात जोरदार सामना झाला. रेवती पवार विजय ठरली तर किरण राजपूत उपविजेती झाली. दहा महिला नामवंत या आखाड्यात पैलवानांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या मुलींनी मुलासोबत कुस्ती खेळत विजय मिळवला.
सहभागी महिला पैलवानामध्ये पायल गव्हाणे (मुंगी तालुका शेवगाव) श्रेयस रकटे (मुंगी तालुका शेवगाव) नंदिनी तांबे (डोणगाव तालुका पैठण) सोनाली गिरगे (मायगाव तालुका पैठण) शारदा डोईफोडे (रुई भराडी तालुका अंबड) पुनम घोटाळे (मुंगी तालुका पैठण) भारती वारुंगळे (पाथर्डी) कल्याणी नरवडे (बिडकीन तालुका पैठण) रेवती पवार (चापनेर तालुका कन्नड) आणि किरण राजपूत (हनुमान नगर, राजस्थान) यांचा समावेश होता. या दहा मुलींनी मुलासोबत कुस्ती करून विजयी झाल्या.
